शरद पवारांचा थरारक खुलासा : “वसंतदादांचे सरकार आम्हीच पाडले,   नंतर त्यांनीच मला मुख्यमंत्री केले”


पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीतील एक महत्वाचा किस्सा रविवारी (दि. 17 ऑगस्ट 2025) उलगडला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी सांगितले की, “वसंतदादा पाटील हे आमचे नेते होते, मात्र ते इंदिरा गांधींच्या काँग्रेसमध्ये होते. आम्ही मात्र यशवंतराव चव्हाणांच्या विचारांनी प्रेरित झालो होतो. निवडणुकीनंतर दोन्ही काँग्रेस पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापनेचा प्रयत्न करत होते. पण आम्हा तरुणांना ते मान्य नव्हते. त्यामुळे आम्हीच वसंतदादांचे सरकार घालवले. त्यानंतर मी मुख्यमंत्री झालो.”

या थेट कबुलीने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. पवार पुढे म्हणाले की, “ज्या वसंतदादांचे सरकार मी पाडले, त्याच वसंतदादांनी भूतकाळ विसरून गांधी-नेहरूंच्या विचारांसाठी मला मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा दिला. त्या काळच्या नेतृत्वाची ही मोठी मनोवृत्ती होती.”

वसंतदादा पाटील आणि शरद पवार यांच्या राजकीय प्रवासात अनेक चढ-उतार झाले. मात्र या वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील एक महत्वाचे पान पुन्हा समोर आले आहे. पवार यांची ही स्पष्ट कबुली आगामी काळात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या समीकरणांवरही चर्चा रंगवणार हे निश्चित आहे.

Leave a Comment