अंतराळातून परतल्यानंतर मोबाइल जड वाटला! गगनयानासाठी शुभांशु शुक्लाचे अनुभव


भारताचे युवा अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांनी अ‍ॅक्सिओम-4 (Axiom-4) या खाजगी अंतराळ मोहिमेत यशस्वी सहभाग घेतल्यानंतर पृथ्वीवर परत आल्यावरचे आपले अनुभव शेअर करताना काही विलक्षण क्षण उलगडले. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाशी पुन्हा जुळवून घेणे किती कठीण असते, हे सांगताना त्यांनी मोबाईल आणि लॅपटॉप यासारख्या दैनंदिन उपकरणांचीही गमतीशीर उदाहरणे दिली.

एका वर्च्युअल प्रेस कॉन्फरन्समध्ये शुभांशु म्हणाले, “मिशननंतर काही आठवड्यांनी जेव्हा मी पृथ्वीवर आलो, तेव्हा एक क्षण असा होता की मला केवळ मोबाईल हातात धरताना तो जड वाटला. मी फोटो काढण्यासाठी मोबाईल घेतला आणि माझ्या मनात एकच विचार आला – ‘हे इतकं जड का आहे?'”

याच अनुभवाचे दुसरे उदाहरण देताना ते म्हणाले, “मी बिछान्यावर बसलो होतो आणि लॅपटॉपवर काही काम करत होतो. काम झाल्यावर मी लॅपटॉप बंद करून सहजपणे तो बिछान्याच्या बाजूला ठेवला. पण त्या क्षणी मी अजूनही झिरो ग्रॅव्हिटीच्या सवयीत होतो. मला वाटलं तो तिथेच तरंगत राहील… पण तो थेट जमिनीवर आपटला!”

शुभांशु यांनी स्पष्ट केलं की अंतराळात काही आठवडे घालविल्यानंतर शरीराचे आणि मेंदूचे गुरुत्वाकर्षणाशी नाते बदलते. म्हणूनच पृथ्वीवर परत आल्यावर प्रत्येक हालचाल पुन्हा शिकावी लागते.

याचप्रमाणे, शुभांशु यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी दिलेले “होमवर्क” सुद्धा अंतराळ स्थानकावर पूर्ण केल्याचे सांगितले. “गगनयान”सारख्या भारतीय अंतराळ मोहिमेसाठी या अनुभवांचे फार मोठे योगदान असेल, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

भारताच्या अंतराळ क्षेत्रातल्या नव्या पर्वात अशा अनुभवांनी केवळ तांत्रिकच नव्हे तर मानवी दृष्टिकोनातूनही महत्त्वाची भूमिका निभावली आहे. शुभांशु शुक्ला यांचे हे निरीक्षण आणि अनुभव भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला गगनयानसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत.

Leave a Comment