कर्नाटकमध्ये माजी लिपिकाच्या घरी लोकायुक्तांचा मोठा छापा; ३० कोटींची बेहिशोबी मालमत्ता उघड
कर्नाटक: राज्यातील भ्रष्टाचार विरोधी मोहिमेअंतर्गत कर्नाटक लोकायुक्तांनी मोठी कारवाई करत एका माजी लिपिकाच्या घरी छापा टाकून तब्बल ३० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता उघडकीस आणली आहे. ही कारवाई राज्यभरातील ४१ ठिकाणी एकाच वेळी करण्यात आली असून, संपूर्ण प्रकरणाने प्रशासनात खळबळ माजवली आहे.
ही कारवाई कलकप्पा निदागुंडी या लिपिकावर केंद्रित होती. तो कर्नाटक रूरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट लिमिटेड (KRIDL) या संस्थेमध्ये लिपिक म्हणून कार्यरत होता. विशेष म्हणजे त्याचा मासिक पगार फक्त १५,००० रुपये असतानाही, त्याच्याकडे २४ निवासस्थानं, ४ प्लॉट, ४० एकर शेती, तसेच ३५० ग्रॅम सोनं, दीड किलो चांदी, आणि चार वाहने (२ कार, २ दुचाकी) आढळून आली आहेत.
छाप्यात समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, कलकप्पा निदागुंडी आणि KRIDL चे माजी अभियंता झेडएम चिंचोलकर यांनी मिळून ९६ अपूर्ण प्रकल्पांसाठी बनावट कागदपत्रं तयार केली होती. यामार्फत त्यांनी ७२ कोटींहून अधिक रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. याबाबत लोकायुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती.
न्यायालयाच्या आदेशानंतर लोकायुक्तांनी तपास सुरु केला आणि २३ जुलै २०२५ रोजी, या प्रकरणी बंगळुरू, म्हैसूर, तुमकुरु, कलबुर्गी, कोप्पल आणि कोडागु जिल्ह्यात ८ सरकारी अधिकाऱ्यांवर एकाचवेळी छापे टाकले. या कारवाईत एकूण ३७.४२ कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
या प्रकरणात कोप्पलचे आमदार राघवेंद्र हितनाळ यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “सरकार या प्रकरणाची सखोल चौकशी करेल आणि दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल. भ्रष्टाचाराला कुठलीही गती दिली जाणार नाही.”
कर्नाटक सरकार आणि लोकायुक्त यंत्रणा सध्या भ्रष्टाचारविरोधात आक्रमक भूमिकेत असून, अशा कारवायांमुळे अनेक लपलेले आर्थिक गैरव्यवहार समोर येत आहेत. हे प्रकरण देखील त्याचाच एक गंभीर भाग मानला जात आहे.