कोल्हापूर – कोल्हापुरात पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर नांदणी मठात नागरिकांच्या आणि लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत ‘माधुरी ऊर्फ महादेवी हत्तीण’ परत आणण्यासाठी शपथविधी पार पडला. स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांच्या नेतृत्वात शपथविधी घेण्यात आली.
शुक्रवारी दुपारी कोल्हापुरात झालेल्या बैठकीत कामगारमंत्री सुरेश खाडे, खासदार धैर्यशील माने, खासदार धनंजय महाडिक, आमदार डॉ. अशोकराव माने, आमदार सत्यजित देशमुख, आमदार राहुल आवाडे, माजी खासदार राजू शेट्टी, उद्योगपती अण्णासाहेब चकोते, भाजप नेते सावकार मादनाईक, संजय पाटील-यड्रावकर, दक्षिण सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, रावसाहेब पाटील, कृष्णराज महाडिक यांच्यासह इतर मान्यवरांची तीन तास बंद खोलीत चर्चा झाली.
या बैठकीनंतर महास्वामी नांदणी मठात दाखल झाले. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास धर्मसभास्थळी महास्वामींसह सर्व मान्यवर आले. यावेळी महास्वामी म्हणाले, “माधुरी ऊर्फ महादेवी हत्तीण हा विषय सर्वधर्मीयांच्या भावना गुंतलेला आहे. न्यायालयीन प्रक्रियेतून सकारात्मक निर्णय येईपर्यंत सर्वांनी संयम राखावा,” असे आवाहन त्यांनी केले.
या धर्मसभा आणि शपथविधी प्रसंगी डॉ. सागर पाटील, सागर संभुशेट्टे, धनंजय टारे, विशाल चौगुले, राहुल बंडगर, राजेंद्र झेले, संतोष खामकर, जोतिराम जाधव, नितीन बागे, शेखर पाटील यांच्यासह विविध धर्मांचे पदाधिकारी व हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
या ऐतिहासिक उपस्थितीमुळे ‘महादेवी हत्तीण’ विषयाला आता फक्त कोल्हापूर नाही, तर संपूर्ण देशातून पाठिंबा मिळण्याची चिन्हे आहेत. यानंतर या आंदोलनाची पुढील दिशा काय असेल, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
