Maharashtra Election 2024, Election Commission, VVPAT: महाराष्ट्र विधानसभेच्या 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर निवडणूक आयोगाने घेतलेल्या तपासणीत, ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन) यंत्रांमध्ये कोणताही फेरफार आढळून आलेला नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यातील विविध मतदारसंघांमध्ये यंत्रांच्या कार्यक्षमतेची तपासणी करण्यात आली आणि सर्व यंत्रे योग्य स्थितीत असल्याचे निदर्शनास आले आहे.
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 उमेदवारांच्या विनंतीनुसार 10 विधानसभा मतदारसंघांतील बुथ लेव्हल युनिट (BU), कंट्रोल युनिट (CU) आणि व्हीव्हीपॅट (VVPAT) यंत्रांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत सर्व यंत्रांचा निकाल मॉक पोल आणि काउंटिंग स्लिपशी तंतोतंत जुळणारा असल्याचे आढळले.
या प्रक्रियेत 8 उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष उपस्थित होते. एकूण 48 बुथ युनिट्स, 31 कंट्रोल युनिट्स आणि 31 व्हीव्हीपॅट्स यांची यशस्वी चाचणी घेण्यात आली. तपासणी दरम्यान कोणत्याही यंत्रात दोष किंवा फेरफार आढळून आलेला नाही.
पनवेल, अलीबाग, अर्णी, येवला, चंद्रगड, कोल्हापूर उत्तर, तसेच माजलगाव या मतदारसंघांमध्ये मॉक पोलसह यंत्रांची चाचणी घेण्यात आली. निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, ईव्हीएम यंत्रे सुरक्षित असून त्यामध्ये कोणतीही छेडछाड होऊ शकत नाही. त्यामुळे मतमोजणीनंतरचे निकाल पूर्णपणे विश्वसनीय असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
कोपरगाव, ठाणे आणि रत्नागिरीच्या मतदारसंघांमध्ये देखील उमेदवारांच्या उपस्थितीत यंत्रांची तपासणी करण्यात आली. निकालात व मतमोजणीत शंका घेण्याचे कोणतेही कारण नाही, असे आयोगाच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.