कोल्हापूर – शिरोळ तालुक्यातील नांदणी गावातील महादेवी हत्तीला गुजरातमधील वनतारा प्रकल्पात हलवल्यामुळे निर्माण झालेल्या वादाने आता मोठं राजकीय व सामाजिक स्वरूप घेतलं आहे. या प्रकरणात रिलायन्स समुहाचे अनंत अंबानी यांनी स्वतः दखल घेतली असून, त्यांच्या निर्देशानुसार वनताराचे वरिष्ठ अधिकारी कोल्हापुरात दाखल झाले आहेत.
या शिष्टमंडळात वनताराचे प्रमुख अधिकारी असणार असून, ते नांदणी गावाला भेट देऊन गावकऱ्यांसोबत थेट संवाद साधणार आहेत. या चर्चेत पश्चिम महाराष्ट्रातील खासदार धनंजय महाडिक हे देखील उपस्थित राहणार आहेत. गावकऱ्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
महादेवी हत्तीला वनतारात नेण्यावरून नांदणी गावात आणि संपूर्ण कोल्हापूर, सांगली, सातारा तसेच कर्नाटकमधील सीमाभागात तीव्र नाराजी दिसून आली आहे. गावकऱ्यांच्या भावनांचा उद्रेक झाल्यानंतर अनेक राजकीय नेतेदेखील मैदानात उतरले आहेत.
काल काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी एक गूगल फॉर्म आणि QR कोडच्या माध्यमातून जनतेकडून ऑनलाइन सह्या गोळा करण्याची मोहीम सुरू केली. देशभरातून या मोहिमेला भरघोस प्रतिसाद मिळत असून, सोशल मीडियावर याचे व्हिडिओ आणि पोस्ट्स मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.
माजी खासदार राजू शेट्टी यांनी स्वतः ‘जिओ’ कंपनीवर नाराजी दर्शवत सिम पोर्ट केल्याची माहिती दिली आहे. कोल्हापूर जिल्ह्यासह अनेक भागांतील नागरिकांनी जिओ नेटवर्कवर बहिष्कार टाकत सिम पोर्ट करतानाचे व्हिडिओ शेअर केले आहेत.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर वनताराचे शिष्टमंडळ कोल्हापुरात दाखल झाले असून, लवकरच नांदणीतील मठाधिपती आणि गावकऱ्यांची भेट घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. वनताराकडून यानंतर काय भूमिका मांडली जाते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
– शुभम गौराजे