महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या सेटवर रंगली ‘फुलवंती’ चित्रपटाची चर्चा, पृथ्वीक प्रताप म्हणतो, “मला फुलवंती पेक्षा…

‘फुलवंती’: 11 ऑक्टोबरला प्रदर्शित झालेला प्रवीण तरडे लिखित आणि स्नेहल तरडे दिग्दर्शित ‘फुलवंती’ हा चित्रपट सध्या रसिकांच्या मनावर राज्य करीत आहे. महाराष्ट्रातील इतिहास, सांस्कृतिक परंपरा आणि कलाविष्काराच्या धाग्यांनी विणलेली ही कहाणी चित्रपटाच्या माध्यमातून पहायला मिळत आहे. सुप्रसिद्ध लेखक बाबासाहेब पुरंदरे यांच्या लेखणीतून उतरलेली ‘फुलवंती’ ही कथा चित्रपटरुपात साकारली गेली आहे. पेशवाई काळातील सुप्रसिद्ध नर्तिका फुलवंती आणि प्रकांड पंडित व्यंकटशास्त्री यांच्या प्रेमकहाणीची ही गाथा आजच्या पिढीसमोर एका अनोख्या अंगाने आणण्यात आली आहे.

चित्रपटातील ‘फुलवंती’ची भूमिका प्राजक्ता माळीने अत्यंत ताकदीने साकारली आहे. तर अभिनेता गश्मीर महाजनीने व्यंकटशास्त्रीचे पात्र जगवले आहे. दोन्ही कलाकारांनी त्यांच्या भूमिकांना दिलेल्या जीवंततेमुळे या चित्रपटातील प्रेम आणि त्यागाची कथा अधिक हृदयस्पर्शी झाली आहे. फुलवंतीच्या रूपाने सादर केलेल्या नृत्याविष्कारांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे. त्यामुळे हा चित्रपट केवळ कथा आणि अभिनयामुळे नव्हे तर नृत्य आणि संगीताच्या रसरशीत सौंदर्यामुळेही लक्षवेधी ठरला आहे.

चित्रपटातील गाणीही विशेष लक्षवेधी ठरली आहेत. यातील संगीत प्रेक्षकांच्या मनाची पकड घेऊन राहते. या गाण्यांमधून पेशवाई काळातील शाहीपण आणि त्याच वेळी फुलवंतीच्या प्रेमकथेचा साजही प्रेक्षकांना अनुभवता येतो. त्यामुळे या कलाकृतीला रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळतो आहे.


‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमाच्या सेटवरही ‘फुलवंती’ चित्रपटाची चर्चा रंगली आहे. यावेळी हास्यजत्रेतील कलाकारांनी चित्रपटाच्या कौतुकासह आपला अनुभव शेअर केला. या चर्चेचा एक व्हिडीओ प्राजक्ता माळीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये हास्यजत्रेतील कलाकार पृथ्वीक प्रताप आणि वादक अमीर हडकर यांनी चित्रपटाबद्दल उत्साहाने बोलले. पृथ्वीक प्रताप म्हणतो, “मला फुलवंती पेक्षा जास्त फुलवंतीची मीरा होतं असताना आवडलं,” तर अमीर हडकरनेही चित्रपटातील कलावंतांचे कौतुक केले.

फुलवंती चित्रपटाद्वारे प्राजक्ता माळीने निर्मिती क्षेत्रात पहिले पाऊल टाकले आहे. तिच्या या नव्या प्रवासाबद्दल ती म्हणते, “दर्जेदार साहित्यकृती माझ्याकडे आल्याने मी निर्माती म्हणून एक भव्य कलाकृती करण्यास तयार झाले.” या तिच्या निर्णयाला पॅनोरमा स्टुडिओजनेही पाठिंबा दिला आहे. पॅनोरमा स्टुडिओजचे मॅनेजिंग डिरेक्टर कुमार मंगत पाठक म्हणतात, “फुलवंती हा चित्रपट निर्मिती क्षेत्रात एक नवीन मानदंड ठरेल.”

‘फुलवंती’ हा चित्रपट म्हणजे सृजनाचा, प्रेमाचा आणि त्यागाचा एक अद्वितीय प्रवास आहे.

Leave a Comment