गुंतवणूकदारांचे 38 हजार कोटी रुपये बुडाले; ओला इलेक्ट्रिकमध्ये मोठा ले-ऑफ

ओला इलेक्ट्रिकने आपल्या कर्मचाऱ्यांवर मोठा निर्णय घेत 500 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे आणि ग्लोबल संकेतांमुळे कंपनीला मोठा फटका बसला आहे. यामुळे शेअरच्या किंमती 55 टक्क्यांनी घसरल्या असून, गुंतवणूकदारांचे तब्बल 38 हजार कोटी रुपये बुडाले आहेत.

शेअर बाजारात घसरणीचा फटका

कंपनीने ऑगस्ट 2024 मध्ये आपला आयपीओ (IPO) लाँच केला होता. 6,145.56 कोटी रुपयांचा हा IPO प्राइज बँड 72-76 रुपयांमध्ये खुला करण्यात आला होता. सुरुवातीला गुंतवणूकदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे कंपनीला फायदा झाला. मात्र, सध्या कंपनीच्या शेअरची किंमत 100 रुपयांच्या खाली आली आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये नाराजी पसरली आहे.



कर्मचाऱ्यांना नारळ

कंपनीने 4000 कर्मचाऱ्यांपैकी 12 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याची योजना आखली आहे. डिसेंबर 2024 पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वी 2022 मध्येही कंपनीने मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले होते.

वाढत्या डिलिव्हरीच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

ओला इलेक्ट्रिकने सप्टेंबर तिमाहीत चांगल्या नफ्याची नोंद केली होती. इलेक्ट्रिक स्कूटरच्या डिलिव्हरीत 73.6 टक्क्यांनी वाढ झाली असतानाही कंपनीने हा निर्णय घेतल्याने उद्योग जगताला मोठा धक्का बसला आहे.



चर्चेत ओला इलेक्ट्रिक

भावीश अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील ओला इलेक्ट्रिकने अल्पावधीतच इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारपेठेत आपली ओळख निर्माण केली होती. मात्र, शेअर बाजारातील घसरणीमुळे आणि मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांना कमी करण्याच्या निर्णयामुळे कंपनी सध्या चर्चेत आहे.

गुंतवणूकदारांसाठी हा मोठा झटका असल्याचे मानले जात आहे. कंपनीच्या आगामी धोरणांवर आणि पुनर्रचनेवर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.

Leave a Comment