महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: सुरुवातीच्या टप्प्यात तांत्रिक अडचणींमुळे मतदान प्रक्रियेला विलंब

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्यातील 288 जागांसाठी एकाच टप्प्यात निवडणुका पार पडत असून मतदार मोठ्या संख्येने मतदान केंद्रांवर दाखल होत आहेत. मात्र, सुरुवातीच्या काही तासांतच अनेक ठिकाणी ईव्हीएम आणि अन्य तांत्रिक अडचणींमुळे मतदान प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले आहेत.



छत्रपती संभाजीनगरमधील अडचणी


छत्रपती संभाजीनगरमधील चार मतदान केंद्रांवर तांत्रिक बिघाड झाल्याचे समोर आले आहे. फुलंब्रीतील पिर बावडा येथे ईव्हीएममध्ये बिघाड झाल्यामुळे मतदान प्रक्रिया ठप्प झाली. दोन ठिकाणी कंट्रोल युनिट तर एका ठिकाणी व्हीव्हीपॅट बिघडले. शिवाय, चार ठिकाणी बॅलेट मशीनमध्ये अडचणी आल्या.



मुंबईतही मतदान प्रक्रियेला धक्का

मुंबईतील शिवडी-लालबाग मतदारसंघातील आर.एम. भट शाळेतील मतदान केंद्रावर ईव्हीएम क्रमांक 41 क्रमांकाची मशीन बंद पडली. तसेच, प्रबोधनकार ठाकरे उद्यान येथील मतदान केंद्रावर अपुऱ्या वीजपुरवठ्यामुळे मतदान प्रक्रियेला उशीर झाला.

जळगाव आणि नाशिकमध्येही अडथळे

जळगावच्या जामनेरमधील न्यू इंग्लिश स्कूल येथे ईव्हीएम मशीन सुरू होण्यात अडचण आल्यामुळे मतदानास पंधरा ते वीस मिनिटांचा विलंब झाला. नाशिकच्या येवल्यात जनता महाविद्यालयातील यंत्रात बिघाड झाल्यामुळे मतदान प्रक्रियेवर परिणाम झाला.

दादर आणि अकोल्यातील तांत्रिक समस्या

दादरच्या नाबर विद्यालयातील ईव्हीएम मशीन बंद पडल्यामुळे मतदानास सुरुवातीला अडथळा आला. अकोल्यातील वाडेगाव मतदान केंद्र क्रमांक 208 वर अद्याप मतदान सुरू होऊ शकले नाही.





मतदारांचा उत्साह कायम

तांत्रिक बिघाडामुळे काही ठिकाणी मतदान प्रक्रिया खोळंबली असली, तरीही मतदारांमध्ये उत्साह दिसून आला आहे. निवडणूक आयोगाने यंत्रणा सुधारण्यासाठी तांत्रिक कर्मचाऱ्यांची मदत घेतली असून शक्य तितक्या लवकर मतदान सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

राज्याच्या विधानसभेसाठी आज होणारे मतदान हा निवडणुकीच्या प्रचारानंतरचा महत्त्वाचा टप्पा आहे. मतपेटीत बंद होणारे मत आज महाराष्ट्राच्या राजकीय भवितव्याला आकार देणार आहे.

Leave a Comment