केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) अधिकाऱ्यांचा रेशन भत्ता बंद; महिनाकाठी ४ हजार रुपयांचे होणार नुकसान

केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) अंतर्गत सहाय्यक कमांडंट ते कमांडंट या ग्राऊंड कमांडर स्तरावरील अधिकाऱ्यांचा रेशन भत्ता बंद करण्यात आला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने दिलेल्या या आदेशानुसार, सीआरपीएफच्या ड्युटी बटालियनमध्ये तैनात नसलेल्या अधिकाऱ्यांना यापुढे रेशन भत्ता मिळणार नाही. परिणामी, संबंधित अधिकाऱ्यांना दर महिन्याला ४००० रुपयांचे आर्थिक नुकसान होणार आहे. ही घोषणा सीआरपीएफ महासंचालकांकडून १ नोव्हेंबरपासून लागू करण्यात येणार असल्याने, अधिकाऱ्यांत नाराजीचे वातावरण आहे.

अधिकाऱ्यांनी सरकारच्या या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली असून, हे पाऊल मनोबल खच्ची करणारे असल्याचे मत व्यक्त केले आहे. यापूर्वी सर्व नियुक्त ठिकाणी हा रेशन भत्ता मिळत असे, मात्र आता केवळ ड्युटी बटालियनमध्ये नियुक्त अधिकाऱ्यांना हा लाभ देण्यात येणार आहे.

चार वर्षांपूर्वी सीआरपीएफच्या ९ रँकवर नियुक्त अधिकाऱ्यांना डिटॅचमेंट अलाऊन्स देण्याचा निर्णय घेतला गेला होता. या वेळी, जर हे अधिकारी रेशन मनीसाठी पात्र असतील तर त्यांना तो भत्ता मिळणार असल्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, सध्याच्या आदेशानुसार, ड्युटी बटालियनमधून इतरत्र नियुक्ती झाल्यास अधिकाऱ्यांना रेशनचा भत्ता मिळणार नाही.

Leave a Comment