मुलीच्या वाढदिवसाच्या फोटोमध्येही दिसला नाही अभिषेक बच्चन; ऐश्वर्याने पोस्ट केले फोटोज

नोव्हेंबर महिना अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनसाठी आणि तिच्या कुटुंबासाठी नेहमीच विशेष राहिला आहे. या महिन्यात तिच्या आयुष्यातील तीन महत्त्वाचे प्रसंग एकत्र येतात. 1 नोव्हेंबरला तिचा वाढदिवस साजरा होतो, 16 नोव्हेंबर रोजी तिची मुलगी आराध्या हिचा वाढदिवस असतो, आणि 21 नोव्हेंबरला तिच्या दिवंगत वडील कृष्णराज राय यांचा जन्मदिवस साजरा केला जातो.

यावर्षी आराध्याने किशोरवयात प्रवेश केला असून ती 13 वर्षांची झाली आहे. ऐश्वर्याने या खास प्रसंगांच्या निमित्ताने तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये आराध्या तिच्या आजोबांच्या फोटोसमोर डोकं टेकताना दिसते, तर ऐश्वर्या वडिलांच्या फोटोसमोर डोळे मिटून उभी आहे. एका फोटोमध्ये ऐश्वर्याची आई देखील दिसते, तर काही फोटो आराध्याच्या बालपणीचे आहेत. शेवटच्या फोटोमध्ये आराध्याच्या वाढदिवसाचा केक कापतानाचा क्षण आहे.

या पोस्टसाठी ऐश्वर्याने भावनिक कॅप्शन दिलं आहे: ‘माझ्या आयुष्यातील सर्वांत प्रिय बाबा-अज्जा आणि माझी प्रिय आराध्या यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. माझं हृदय.. माझा आत्मा.. सदैव आणि त्याही पलीकडे…’.

या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या, मात्र अभिषेक बच्चन याच्या अनुपस्थितीने चाहत्यांचे लक्ष वेधले. फोटोंमध्ये अभिषेक कुठेच दिसला नाही, ज्यामुळे अनेकांनी विचारणा केली की तो या सेलिब्रेशनमध्ये का सहभागी झाला नाही. काहींनी असेही निरीक्षण नोंदवले की ऐश्वर्याच्या हातात लग्नाची अंगठी दिसत आहे, यामुळे विभक्त होण्याच्या अफवांना थोडा ब्रेक मिळाला.

गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चा जोरदार सुरू आहेत. ऐश्वर्याच्या वाढदिवसाला बच्चन कुटुंबाकडून कोणतीही सोशल मीडिया पोस्ट न येणे, तसेच अंबानी कुटुंबातील लग्नसोहळ्यात दोघांचा वेगळा सहभाग, या गोष्टींमुळे अफवांना उधाण आले आहे. याचदरम्यान अभिषेकचं नाव अभिनेत्री निम्रत कौरसोबत जोडलं जात आहे, ज्यांच्यासोबत त्याने ‘दसवी’ चित्रपटात काम केलं आहे.

सध्याच्या चर्चांवर ऐश्वर्या किंवा अभिषेककडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही, मात्र त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावरील चर्चांना नेहमीप्रमाणेच सोशल मीडियावर मोठी हवा मिळत आहे.

Leave a Comment